पुण्यात 24 मे रोजी हेल्मेट सक्ती

पुणे – जनजागृतीसाठी शहर आणि जिल्ह्यात 24 मे रोजी “हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार असून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. जागतिक स्तरावर 15 ते 21 मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात “7 यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023′ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे याबाबत जनजागृतीसाठी हा सप्ताहाचा हेतू आहे.
मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत लाक्षणिक “हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले असून तशा सूचना करण्यात आल्या आहेत.





