पुणे, – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसून, महामार्गांसाठी वरिष्ठ स्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. पुणे शहरात दुचाकीस्वारांसोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे; अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या गेली दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रासने यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गावरील दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचे या वेळी आयुक्तांनी सांगितले आहे. शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक होणार असून, सहप्रवाशालाही हेल्मेट असणे गरजेचे असल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे मध्यवस्तीतील नागरिक संभ्रमात आहेत. याबद्दल आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे आदेश महामार्गासाठी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात. महामार्गावर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे. – हेमंत रासने, आमदार