पुणे | शहराच्या प्रवेशद्वारांवर प्रचंड कोंडी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील उपनगरांतील प्रवेशद्वारांवर सोमवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पावसाची रिपरिप, प्रचंड खड्डे आणि डागडुजी केलेल्या खडड्यांतून निघालेली वाळू यामुळे वाहतूक प्रचंड संथ झाली होती.
यातच रविवारला जोडून आलेल्या राखी पौर्णिमेमुळे बाहेरगावी गेलेले नागरिक पुन्हा शहरात परतत असल्याने वाहनांची संख्या प्रचंड होती.
शहरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नागरिक चारचाकी वाहनांतूनच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. यातच राखी पौर्णिमा असल्याने सोमवारी शहराबाहेर आणि उपनगरांत प्रवास करणारे असंख्य नागरिक होते.
पावसामुळे अगोदरच वाहतूक संथ असल्याने अचानक चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडली. विशेषत: नगर रस्ता, हडपसर, उरुळी कांचन कात्रज-देहुरोड महामार्ग, बोपोडी, जगताप डेअरी आदी ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावाला लागला.
दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत उघडीत दिली नव्हती. यामुळे दुचाकीचालकांना भिजल्याशिवाय पर्याय नव्हता. महामार्गातून शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रचंड पावसापुढे वाहतूक कोंडी सोडविण्यास पोलीसही हतबल होते.




