पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने थैमान; ओला दुष्काळ जाहीर करून तिप्पट मदतीची मागणी

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषांपेक्षा तीनपट अधिक मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार पाटील यांनी दोन्ही तालुक्यांची पाहणी केल्यानंतर ही मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे या भागातील खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झाला असून, शेतात चिखलाचे साम्राज्य असल्याने पीक काढणी शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनीत पाणी साचले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पाचोरा येथे झालेल्या पावसाची आकडेवारी
- १६ सप्टेंबर – ११४.८ मिमी
- २२ सप्टेंबर – १४७.८ मिमी
- २३ सप्टेंबर – १३९.३ मिमी
- २३ सप्टेंबरपर्यंत पाचोरा तालुक्यात सरासरी पावसापेक्षा १८९ टक्के अधिक म्हणजे २५७.८ मिमी पाऊस झाला आहे. तर भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर पर्यंत सरासरीच्या ९०.७० मिमी च्या तुलनेत १७९ टक्के पाऊस झाला आहे.
झालेले प्रमुख नुकसान
- पीक नुकसान: दोन्ही तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
- शेतीचे नुकसान: शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, विहिरी खचल्या आहेत.
- इतर नुकसान: शेतातील पाईपलाईन, ठिबक सिंचन, बांध, फळबागा आणि शेती अवजारे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- पशुधन आणि मालमत्ता: बैल, गाय, बकरी, म्हैस, कोंबडी यांसारख्या पशुधनाची हानी झाली आहे. तसेच, पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमदार पाटील यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन, पश्चिम महाराष्ट्रासाठी ११ सप्टेंबर २०१९ रोजी लागू केलेल्या NDRF निकषांच्या ३ पट अधिक मदत पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.





