रायगड – रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तब्बल 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला आहे. सावित्री नदी इशारा पातळीवर, तर अंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याशिवाय कुंडलिका नदीदेखील इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. सततचा पाऊस सुरूच राहिल्यास नद्यांचा पाणीस्तर आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अलमट्टीबाबत कर्नाटकशी संपर्क कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे. तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेरून वाहत असून राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. काळम्मावाडी, वारणा या धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.