Weather Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव राहणार असून, सात जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज रिमझिम पावसाचा अंदाज आहे, तर कोकणातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांत ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (१६ ऑगस्ट) पुढील चार दिवस कोकणासाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या (१५-१६ ऑगस्ट) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (३०-४० किमी प्रतितास) अपेक्षित आहेत. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
पुणे शहरात पुढील चार दिवस रिमझिम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, परंतु जोरदार पावसाचा इशारा नाही. मात्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथा भागात मुसळधार पाऊस पडेल, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. रायगड आणि रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा इशारा आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर
विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस (१५-१८ ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
बीडमध्ये रात्रभर पावसाची हजेरी
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. शहर आणि ग्रामीण भागात सलग रिमझिम पावसाने वातावरण गारठलेले आणि आनंदी आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीनंतरच्या कामांना गती मिळाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत किरकोळ अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस बीडमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील, ज्यामुळे खरीप हंगाम यशस्वी होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
परभणीत स्वातंत्र्यदिनी पावसाचे सावट
परभणी जिल्ह्यात रात्रभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) झेंडावंदन कार्यक्रमांवर पावसाचे सावट आहे. शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





