Maharashtra Weather : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून, मराठवाडा आणि कोकणात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि इतर जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालयांना २९ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने २७ ते २९ सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाट आणि अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
‘या’ दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी
पालघर जिल्ह्यात उद्या (२९ सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. परिसरात पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि भूस्खलनाचा धोका वाढला असल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर धोक्यामुळे २९ सप्टेंबरला सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे आणि आज निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
“विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकृत आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येईल. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही ऑरेंज अलर्ट असल्याने शाळा सुट्टीची शक्यता आहे.
हवामान विभागाचा इशारा
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी २८ सप्टेंबरसाठी ठाणे, पालघर आणि रायगडसाठी गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची तीव्रता वाढेल. मुंबईत रेड अलर्ट असून, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. IMD ने २७ ते २९ सप्टेंबरसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, उत्तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात २१ सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यामुळे वाहतूक आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.




