सोलापूर शहरात पावसाचा हाहाकार! जनजीवन झाले विस्कळीत

सोलापूर – निसर्गाच्या अवकृपेचा सोलापूरकरांना मोठा फटका बसलेला आहे. सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्गावर केवळ एका बाजूने वाहतूक सुरु आहे. पाणी असलेल्या बाजूने केवळ जड वाहतूक चालू आहे. सोलापूर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत.
नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेक भागात पाणी शिरल्याने अनेक चार चाकी, दुचाकी वाहने पाण्याखाली गेली आहेत. सोलापुरातील वज्रेश्वर नगर भागात लाखो रुपये किमतीच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर पावसाच्या पाण्यातच ही वाहने राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट रोडवरील सादूल पेट्रोल पंप आणि देसाई विडी कारखाना पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. टेकस्टाईल, विडी अशा लहान उद्योगाच्या कारखान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. कारखान्यातील विडी उद्योगासाठी लागणारे कच्चे साहित्य, पॅकिंग मटेरील असे लाखोंच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. आधीच विडी उद्योग लयाला गेलेला असताना सोलापुरातील प्रमुख कारखान्यापैकी एक असलेला देसाई कारखान्याचे मोठे नुकसान अतिवृष्टीने केले आहे.





