घाटमाथ्यावर धो धो पाऊस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत असून, गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरासह लोणावळा, दावडी, सातारा जिल्ह्यातील कोयना येथे धो धो पाऊस झाला. ताम्हिणी घाटमाथ्यावर तब्बल २१० मिमी पावसाची नोंद झाली, तर दावडी येथे १४४, कोयना परिसरात १४१ आणि लोणावळा येथे १३७ मिमी पावसाची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यासह सातारा आणि अन्य जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मागील दोन ते तीन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, गेल्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढू लागला असून, गुरुवारी (दि. २४) दिवसभर आणि शुक्रवारी (दि. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे फेसाळणाऱ्या धबधब्यांचा प्रवाह वाढला असून, या परिसरातील गावांमधील ओढ्या- नाल्यांना पूर आला आहे.
पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही गावांचा संपर्क तुटला. ताम्हिणी घाट परिसरात २४ तासांत २१० मिमी पावसाची नोंद झाली, तर शुक्रवारी (दि. २५) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासांतील घाटमाथ्यावरील पाऊस
ताम्हिणी २१०, दावडी १४४, कोयना १४१, लोणावळा १३७, डुंगरवाडी ११५, शिरगाव ११०, अंबवने ९९, खोपोली ८७, वळवण आणि भिरा येथे ८५ मिमी.




