साताऱ्यासह पश्चिम भागात मुसळधार; महाबळेश्वरसह कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सातारा – सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाने मंगळवारी दमदार बॅटिंग केली. सातारा, जावली, पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील दमदार पावसाने मॉन्सून पूर्णतः सक्रिय झाला असल्याचे स्पष्ट झाले. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासांत १४३ व कोयनानगर येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाने जोर धरल्याने बळीराजा सुखावला असून कोयना धरण क्षेत्रात १५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.
पाटण तालुक्यासह कोयना धरण परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही दिवसेंदिवस वाढत असून सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर १४६, नवजा १११ व महाबळेश्वर येथे १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर धरणातील पाणीसाठ्यात १.३७ टीएमसीने वाढ झाली आहे. नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
जून महिन्यात विस्कळीत पाऊस पडला होता. मात्र, जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवसापासून पश्चिम भागात जोरदार पावसाने सुरूवात केली. मंगळवारी पाटणसह कोयना परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे ओढ्या, नाल्यांना पाणी वाढल्याने तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना, उत्तरमांड या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन त्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे मणदुरे विभागातील साखरी- चिटेघर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने केरा व कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना जलाशयातील पाणीपातळी २०५९.१०६ इंच व ६२७.८३७ मीटर इतकी उंची झाली आहे. शिवाजीसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणात आज २१.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाटण शहरातही दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. ओढे व नाले तुडुंब भरल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली. शहरात मंगळवारी सकाळपासून काही वेळ रिमझिम आणि तर काही वेळ मुसळधार स्वरुपात पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस चौकीच्या बाजूला मोकळ्या जागेत तळे निर्माण झाले होते.
काळोशी येथे म्हैस गेली वाहून
सातारा तालुक्यातील काळोशी येथील शेतकरी युवराज रमेश निकम म्हैस चारण्यासठी काळंबाच्या ओढ्याच्या पलिकडे गेले होते. म्हैस पाण्यात होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास ओढ्याला पुराचे पाणी अचानक आले आणि त्यात म्हैस वाहून गेली. गावकरी म्हशीचा शोध घेत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यात पुरात एक जण बेपत्ता
महाबळेश्वर तालुक्यातधावरी येथील बबन पांडुरंग कदम (वय 62) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली प्रशासनाच्यावतीने त्यांचा शोध सुरु आहे.





