Maharashtra Weather : राज्यात धडकी भरवणारा पाऊस, पुणे-मुंबईत धो-धो; रायगडला रेड अलर्ट

Maharashtra Monsoon Fury : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. रविवारपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान खात्याने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे.
रायगडमध्ये अतितीव्र पावसाचा अंदाज असून, पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट देण्यात आला असून, सोमवारी मुसळधार, तर मंगळवार आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. सोमवार ते गुरुवार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला येलो अलर्ट आहे. कोकणातील नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे, कारण पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे.
सावधगिरीचा इशारा, प्रशासन सज्ज
रायगडसह कोकणात पावसाचा जोर वाढल्याने स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क झाली आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असला, तरी अतिवृष्टीमुळे दैनंदिन जीवन आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर सतत नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
- रेड अलर्ट: रायगड (अतिमुसळधार पाऊस, पूर-भूस्खलनाचा धोका)
- ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), कोल्हापूर (घाटमाथा)
- येलो अलर्ट (जोरदार पाऊस): मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक (घाटमाथा), नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
- येलो अलर्ट (मेघगर्जनेसह पाऊस): बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
नागरिकांना आवाहन
हवामान खात्याने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः रायगड, कोकण आणि घाटमाथ्यावरील रहिवाशांनी अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध राहावे. पावसाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घ्या, असा प्रशासनाचा संदेश आहे.




