मुसळधार पावसाने मावळातील जनजीवन विस्कळीत

वडगाव मावळ, दि. 16 (प्रतिनिधी)- मुसळधार पावसाचा मावळ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पवना धरणातून सुरू असलेल्या विसर्गमुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोथुर्णे गावातील पूल पाण्याखाली गेला होता. पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने काले स्मशानभूमी व निवारा शेडमध्ये पाणी शिरले आहे.
गुरूवारी (दि.15) रात्रीपासून संततधार हजेरी लावल्याने पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू कण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत असून, अन्य धरणांमधील विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणीनदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसाचा तालुक्याला मोठा फटका बसला असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
लोणावळ्यात 200 इंच पावसाची नोंद लोणावळा शहरात यावर्षी पावसाने आतापर्यंत एकूण 200 इंचचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 24 तासात लोणावळा शहरात 118 मिमी (4.65 इंच ) पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 5152 मिमी (202.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत 4272 मिमी (168.19 इंच) पाऊस झाला होता. पावसाचा जोर शुक्रवारी देखील कायम होता. पावसाच्या सोबत जोरदार वारे वाहत असल्याने भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले होते. त्यामुळे सकाळी या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. नगरपरिषद पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून झाड बाजूला केले.





