पावसाची दडी.! सोलापूर शहरात 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय; वाचा सविस्तर…

सोलापूर – पावसाने दडी मारल्याने उजनी धरणातील पाणी पातळीत मोठी घट होत आहे. सध्या उजनीत वजा 30 टक्के पाणी पातळी असून वजा 35 टक्के पाणी पातळी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उजनीतून दुबार पंपिंग करून पाणी घेणार आहे.
त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून त्याची चाचणीही पूर्ण झाली आहे. शहरातील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.
पावसाने दडी मारल्याने ही पातळी घटत आहे. दरम्यान, सध्या आषाढी यात्रा असल्याने उजनीतून पाणी सोडण्यात येत आहे. 4500 क्युसेक्सने चंद्रभागेत उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे. यानंतर उजनी धरणातील पातळी आणखी कमी होणार आहे.
वेळेत पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तसे न झाल्यास ही पातळी अधिक घटणार आहे. यामुळे सोलापूर महापालिका प्रशासनाने उजनी धरणात दुबार पंपिंगचे नियोजन केले आहे. त्याची कार्यवाही ही पूर्ण करण्यात आली आहे.
दुबार पंपिंगची यंत्रणा साधारणत: 25 जूनपासून कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाणी पातळी आणखी कमी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला 10 एचपीचे 30 पंप कार्यान्वित करण्यात येणार आहेत.





