Nanded Rain Alert: नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

नांदेड – राज्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Heavy rain alert in Nanded district)
हवामान विभागाने उद्या (दि. 24) मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला. बुधवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.
तर गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
नांदेड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट –
हवामान विभागाने, नांदेड जिल्ह्यासाठी 23 व 25 सप्टेंबर दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 24 सप्टेंबरला ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 23 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 – 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.
24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 – 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. तर 25 सप्टेंबरला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




