Weather update : केंद्रीय हवामान विभागाने देशभरात पुढील 24 तासांसाठी तीव्र उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. 17 एप्रिल 2026 रोजी उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. वातावरण कोरडे राहणार असून आकाश मुख्यतः निरभ्र असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिमी झंझावात कमकुवत झाल्यामुळे देशातील सुमारे 95 टक्के भागात कोरडे आणि उष्ण-दमट हवामान राहणार आहे. Weather update
महाराष्ट्रातही उष्णतेचा कहर कायम असून राज्यातील 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. अकोला आणि अमरावती येथे तापमान 44 अंशांवर पोहोचले असून नागपूर, धाराशिव आणि वर्धा येथे 43 अंशांची नोंद झाली आहे. बुलढाणा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे तापमान 42 अंशांपर्यंत वाढले आहे. सरासरी तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ झाल्याने काही भागांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 एप्रिलपर्यंत, तर विदर्भात 19 एप्रिलपर्यंत उकाडा तीव्र राहणार आहे. कोकणात पुढील 24 तासांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

Weather Update ।
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून मराठवाड्यापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत. Weather update
राज्य आपत्कालीन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे, ओआरएसचे सेवन करणे, सैल आणि हलके कपडे परिधान करणे यासोबतच बाहेर पडताना छत्री किंवा टोपी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी काळजी घ्यावी आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.