Gunjawani River : गुंजवणी नदी घेणार मोकळा श्वास; नदी पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थ एकवटले
Gunjawani River : वाजत-गाजत मिरवणूक काढून ग्रामस्थांनी केले जलपूजन; नदीचा प्रवाह मोकळा झाल्यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास होणार मदत.

Gunjawani River – पर्यावरण संवर्धन आणि जलसाठा वाढवण्याच्या उद्देशाने, राजगड तालुक्यातील घावर येथे गुंजवणी नदीतील गाळ उपसा कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘रेनट्री फाउंडेशन’ आणि चिरमोडी-घावर व साखर-कोंढवली गट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. गावातून नदीपात्रापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढत पारंपरिक पद्धतीने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी जेसीबी मशीनचे विधिवत पूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, नदीचा प्रवाह मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.
याप्रसंगी ‘रेनट्री फाउंडेशन’चे उपाध्यक्ष स्वानंद दामले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. तौफिक वारसी, फील्ड मॅनेजर शिवदास वायाळ, ग्रामविकास अधिकारी संदेश यादव, शंकर रेणुसे यांच्या हस्ते जलपूजन व मशीनचे पूजन करण्यात आले. नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे जलस्रोतांची साठवण क्षमता वाढणार असून, परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमामुळे घावर आणि साखर परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी ज्ञानेश्वर राझने, अनंता मालसुरे, लक्ष्मण रांझने, क्षेत्रीय अधिकारी प्रविण संगशेट्टी यांच्यासह परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.





