नंदुरबारमध्ये चमत्कार..! रुग्णालयातच हृदयविकाराचा झटका, डॉक्टरच्या तत्परतेने तरुणाला जीवनदान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील मंगल श्याम हॉस्पिटलमध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एक हृदयस्पर्शी आणि चमत्कारिक घटना घडली. एका तरुणाला त्याच्या मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.
हा तरुण डॉक्टरांसमोर बसला असताना अचानक बेचैन झाला आणि काही क्षणांतच बेशुद्ध होऊन त्याची मान खाली पडली. त्याचे हृदयाचे ठोके आणि रक्तपुरवठा पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे त्याच्या मुलीच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटले.
डॉ. योगेश्वर चौधरींची तत्परता
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. योगेश्वर चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने त्यांना ‘हेड-लो पोजिशन’ मध्ये ठेवून तपासणी केली आणि हृदय थांबल्याचे निदान होताच तात्काळ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) प्रक्रिया सुरू केली. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचे हृदय पुन्हा धडकू लागले आणि रक्तपुरवठा पूर्ववत झाला.
यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार देण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, तो हळूहळू बरा होत आहे. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, डॉ. चौधरी यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेतील रुग्ण हा तळोद्यातील नेमसुशील विद्यामंदिर येथील ४२ वर्षीय शिक्षक रविंद्र अरुण गुरव आहे. रविंद्र हे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी ते मंगल श्याम हॉस्पिटलमध्ये आले होते, तेव्हा ही अनपेक्षित घटना घडली. डॉ. चौधरी यांच्या वेळीच केलेल्या उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले, आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद, विशेषतः रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला, द्विगुणित झाला.
गोल्डन अवरचे महत्त्व काय?
हृदयविकाराच्या झटक्यात ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या कालावधीत तात्काळ उपचार मिळाल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता लक्षणीय वाढते. नंदुरबारच्या या घटनेत रुग्ण रुग्णालयातच असल्याने आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने तात्काळ सीपीआर देणे शक्य झाले. डॉ. चौधरी यांनी सांगितले की, “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे.” त्यांनी यानिमित्ताने लवकरच मोफत सीपीआर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या जीवनरक्षक तंत्राचे प्रशिक्षण मिळेल.





