Heart attack : कर्नाटकातील हसन जिल्ह्यात गेल्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृतांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे आणि १८ ते ४० वयोगटातील हे सगळे तरूण आहेत. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांकडून अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने हृदयविकाराच्या घटना रोखण्यासाठी ‘पुनीत राजकुमार हृदय ज्योती’ योजना सुरू केली आहे. परंतु, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलिकडच्या काळात वाढ होत आहे यावर सखोल संशोधनाची गरज आहे. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि असंसर्गजन्य आजार हे हृदयविकाराचे कारण मानले जात असले तरी, हसनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी, तज्ज्ञांच्या पथकाला १० दिवसांत संशोधन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.