health: स्तन कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये आढळणारा सर्वाधिक आजार आहे. दरवर्षी लाखो महिलांना या रोगाचे निदान होते. भारतातील स्थिती देखील अत्यंत चिंताजनक आहे. बीसीआयच्या (Breast Cancer in India) माहितीनुसार, देशात दर चार मिनिटांनी एका महिलेत स्तनकर्करोगाचे निदान होते आणि दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. भारतामध्ये अंदाजे २८ महिलांपैकी १ महिलेला आयुष्यात कधीतरी या रोगाचा धोका संभवतो. वाढते वय, स्थूलता, उशिरा विवाह व गर्भधारणा, बाळाला स्तनपान न देणे अशा अनेक कारणांमुळे या आजाराचा धोका वाढतो. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, योग्य वेळी आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. संशोधनानुसार, दररोजच्या आहारातील काही पदार्थ स्तन कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. स्तन कर्करोगाचा धोका कमी करणारे ६ प्रमुख खाद्यपदार्थ १. डाळिंब दररोज एक कप डाळिंबाचे सेवन केल्यास स्तन कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. डाळिंबामध्ये एलॅजिटॅनिन नावाचे घटक असतात, जे कर्करोगजन्य पेशींची वाढ कमी करतात आणि इस्ट्रोजेनवर अवलंबून असलेली वाढ नियंत्रित करतात. २. आवळा आणि पेरू आवळा आणि पेरू हे दोन्ही विटामिन ‘सी’ ने परिपूर्ण आहेत. ही फळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, डीएनएचे नुकसान दुरुस्त करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. जे कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे आहे. ३. अळशीचे बी (फ्लॅक्स सीड्स) अळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन हे वनस्पतिजन्य इस्ट्रोजेन घटक आढळतात, जे शरीरातील इस्ट्रोजेनचे संतुलन राखतात आणि कर्करोग पेशींची वाढ मंदावतात. पिसलेली अळशी दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाता येते. ४. क्रुसिफेरस भाज्या फुलकोबी, ब्रोकोली, कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये सल्फोराफेन आढळतो. हा घटक यकृताला हानिकारक इस्ट्रोजेन उप-उत्पादकांचे शुद्धीकरण करण्यास मदत करतो आणि गाठींची वाढ रोखतो. या भाज्या अल्प शिजवून किंवा कच्च्या स्वरूपात खाणे अधिक हितकारक. ५. ऑलिव्ह तेल ऑलिव्ह तेलातील पॉलीफेनॉल्स सूज कमी करतात, शरीरातील निरोगी पेशींचे संरक्षण करतात आणि गाठींच्या वाढीचा वेग कमी करतात. हे तेल स्वयंपाकात किंवा सॅलडवर वापरता येते. ६. सोयाबीन आणि कडधान्ये सोयाबीन, टोफू, सोया-दूध तसेच विविध कडधान्यांमध्ये आइसोफ्लेवोन्स असतात. हे नैसर्गिक सौम्य इस्ट्रोजेनप्रमाणे कार्य करून हार्मोनचे संतुलन राखतात आणि स्तन कर्करोगाचा धोका कमी करतात.