Health news : पावसाळ्यात भिजल्यावर ताप, लाल डोळे आणि अंगदुखी जाणवत आहे? सावधान! हे साधं सर्दी-ताप नाही ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण आहे
हेच साचलेले पाणी जीवघेण्या 'लेप्टोस्पायरोसिस' या संसर्गजन्य आजाराला निमंत्रण देऊ शकते, असा इशारा मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

Leptospirosis Symptoms : राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. अशा पाण्यातून दररोज हजारो नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. मात्र हेच साचलेले पाणी जीवघेण्या ‘लेप्टोस्पायरोसिस’ या संसर्गजन्य आजाराला निमंत्रण देऊ शकते, असा इशारा मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
पावसाळ्यात ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. साचलेल्या पाण्यात उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या लघवीतून पसरणारे लेप्टोस्पायरा हे जीवाणू असू शकतात.
जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंडाद्वारे हे जीवाणू शरीरात प्रवेश करून लेप्टोस्पायरोसिस हा संसर्गजन्य आजार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या २१ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, यावर्षी राज्यात लेप्टोस्पायरोसिसचे १५८ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही बाब दिलासादायक असली तरी पावसाळ्याचा कालावधी अद्याप बाकी असल्याने संसर्गाचा धोका कायम आहे.
तुलनेत, २०२५ मध्ये याच कालावधीत ८५८ रुग्णांची नोंद झाली होती आणि २१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले असले, तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, पावसाळ्यात पाणी साचलेल्या भागात काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांसाठी विशेष मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात येणार आहे.
तसेच घरभेटी दरम्यान ताप किंवा संशयास्पद लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना तातडीने पालिकेच्या दवाखान्यात पाठविण्याच्या सूचना आरोग्य सेविकांना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लेप्टोस्पायरोसिसची सुरुवात साध्या तापासारखी वाटू शकते. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यास याचा परिणाम यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदूवर होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा डोळे लाल होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
अत्यावश्यक कामाशिवाय पाणी साचलेल्या भागातून जाणे टाळावे.
घरात आणि परिसरात पाणी साचू देऊ नये.
पाण्यातून चालल्यानंतर हात-पाय स्वच्छ साबणाने धुवावेत.
शेती किंवा चिखलात काम केल्यानंतर स्वच्छता राखावी.
भाज्या आणि फळे स्वच्छ धुवूनच खावीत.
हात-पायांवरील जखमा झाकून ठेवाव्यात आणि आवश्यक असल्यास जंतूनाशक मलम वापरावे.
ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, डोकेदुखी किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसल्यास स्वतः औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहणे आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वेळेत निदान आणि उपचार झाल्यास लेप्टोस्पायरोसिसवर प्रभावी उपचार शक्य आहेत. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसताच विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.






