Pune District : ऊस तोडणी मजुरांची पालावर आरोग्य तपासणी.

राहू : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ऊस तोडणी मजुरांचे आरोग्य निरोगी राहण्याठी कार्यक्षेत्रातील मजुरांच्या पालावर जाऊन मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याचा लाभ एकूण ४४ ऊस तोडणी वाहतूक बंधू-भगिनींनी घेतला आहे. कारखान्याकडून दरवर्षी अभिनव, विधायक उपक्रम राबविले जात आहेत.
श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. उस तोडणी वाहतूक मजूर कुटुंबासहित कारखाना परिसरात तसेच कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. परिसरातील ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी कारखान्यामार्फत श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात केली होती. परंतु मजूर वाहन टोळ्या तसेच ट्रॅक्टरने वाहतुक करणार्या टोळ्या या कार्यक्षेत्रात विविध गावात स्थलांतरित झालेल्या असतात. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबाने हवेली- अष्टापूर गटामध्ये पिंपरी-सांडस येथील प्रत्यक्ष मजूर अड्ड्यावरच आरोग्य तपासणी करण्याचे आयोजन केले होते.
यात वाडे-बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य तपासणी केली. ऊस तोडणी मजुरांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर आदी तपासणी केल्या. कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत औषधांचेही वाटप केले. शिबिरात प्रामुख्याने महिलांची आरोग्यविषयक तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिरानिमित्त अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.
याप्रसंगी वाडे-बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सूर्यवंशी व डॉ. हरेश लोहार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. महेश वडदरे, डॉ. अनघा पाचलेजावकर, डॉ. प्रवीण गजरे, राणी दौंडकर, सुनीता भोरडे यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी ए. बी. शेंडगे, शेतकी विभागातील सर्व स्टाफ, ऊस वाहतूक कंत्राटदार व ऊस तोडणी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मजुरांचे आरोग्य चांगले राहावे, हाच उद्देश
कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, ऊस तोडणी बांधवांचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता कारखान्याच्या वतीने त्यांची मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन केलेले आहे. कारखान्यावर वास्तव्यास मजुरांची काळजी कारखाना घेतच असतो. परंतु कार्यक्षेत्रामध्ये विविध गावात विखुरलेल्या ऊस तोडणी मजुरांचीही तपासणी व्हावी त्यांचे आरोग्य चांगले राहावे. हा आजच्या तपासणीचा मुख्य उद्देश आहे. कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.





