Pune District : माऊली मंदिरातील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुजारी, कर्मचार्यांच्या आरोग्य तपासणी, नेत्र तपासणीचे गुरुवारी (दि. 19) आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी 70 पेक्षा अधिक पुजारी आणि कर्मचार्यांची रक्तदाब, शुगर आरोग्य तपासणी करुन आवश्यक ते उपचार मार्गदर्शन केले. तसेच नेत्र तपासणी करुन आवश्यकता असलेल्या 54 जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी राहुल चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद देऊन आरोग्य तपासणी शिबिरास शुभेच्छा दिल्या. माऊलींच्या समाधी दर्शनानंतर देवस्थानच्या वतीने चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, पुजारी प्रफुल्ल प्रसादे, अमोल गांधी, योगेश चौधरी, तुषार प्रसादे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, तालुका प्रमुख शंकर घेणंद, विनायक महामुनी, महिला आघाडीच्या मनिषा थोरवे, डॉ. विकास थोरवे, दिनकर तांबे, रोहिदास कदम, शिवाजी पाडेकर यांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शिबिरात देवस्थानचे अंबादास कवितके, श्रीकांत लवांडे, राजू दुराफे, बाळासाहेब मोरे, महादू रत्नपारखी, जया लोखंडे, ज्ञानेश्वर पोंदे, कृष्णा शिंदे, बल्लाळेश्वर वाघमारे, अशोक गावडे यांसह 70 पेक्षा अधिक कर्मचारी, पुजारी यांची तपासणी करण्यात आली. शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या आयोजनामुळे पुजारी व मंदिराचे कर्मचार्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन राहुल चव्हाण यांनी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबवणार असल्याचे सांगितले.
या शिबिरात वैद्यकीय अधिकार्यांमध्ये सूर्या ऑप्टीक्स् अॅण्ड कॉन्टेक्ट लेन्स क्लिनिकचे डॉ. सुशांत त्रिवेदी, धारा हॉस्पिटल अॅण्ड नर्सींग होमचे डॉ. सुहास गायकवाड, डॉ. टि. एस. गायकवाड यांसह सहकार्यांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने माऊलींची सेवा करणार्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.





