Health Camp: भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
Health Camp:

8 ते 10 हजार वारकऱ्यांची तपासणी
पुणे : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करून पुण्यनगरीत विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून. महाप्रसाद सेवेचा तर जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी असतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात
यंदाच्या आषाढी वारीतही “सेवा हीच साधना” या भावनेतून वारकरी भाविकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. वारकरी भाविकांनी या सेवांचे कौतुक करीत ट्रस्टच्या उपक्रमाचे स्वागत केले.





