इंदापूर : “आयुष्य जगण्यासाठी आधार हवा आणि हा आधार देणारे हात बनणे हे खरे जीवन आहे. भारतीय संस्कृतीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या हिताची काळजी घेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे,” असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात दिव्यांग आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री भरणे यांनी सांगितले, “आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. वयोमानामुळे किंवा अपंगत्वामुळे कोणीही समाजापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या शिबिरातून हजारो लाभार्थ्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ होईल.” शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने लाभार्थ्यांची शारीरिक तपासणी करून त्यांना आवश्यक असलेल्या सहाय्यक साधनांची (काठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे आदी) नोंद केली. पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत व्हीलचेअर, कमोडसह व्हीलचेअर, काठ्या, श्रवणयंत्र, कंबर, गुडघा, पाठ आणि गळ्याचे पट्टे, बसण्याची गादी, कमोड चेअर आदी साधने शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिराला हजारो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत कोकाटे, अतुलराव झगडे, सचिन सपकळ, विष्णू पाटील यांच्यासह इंदापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. या शिबिराने सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याचा आदर्श प्रस्थापित केला.