Satara News : कोयना दौलत डोंगरी महोत्सवांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

कोयनानगर : ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025’ यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने बुधवारी दि. १६ रोजी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ‘आरोग्य रथ’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे आरोग्यसेवेचे मोठे पाऊल ठरणार आहे.
आरोग्य शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी आणि महिलांसाठी विशेष तपासण्या केल्या जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित राहून मोफत सेवा देणार आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनात विशेष लक्ष घातले आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाने व त्यांच्याच पुढाकाराने हा आरोग्य शिबिराचा उपक्रम आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





