पिंपरी | हेडींग – पितृ पंधरवडा, कावळ्यांचा तुटवडा

कान्हे, (वार्ताहर) – दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृ पक्ष सुरू होतो. पितृ पक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पितरांचे भक्तीभावाने श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पितृपक्षात पशू-पक्ष्यांची सेवा केल्याने विशेष लाभ होतो, असे मानले जाते.
त्यामुळे पितृपक्ष काळात कावळे, गाय, कुत्रे इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग दिला जातो. यातूनच कावळ्याला नैवद्य दाखविण्याची परंपरा रुढ झाली आहे. सध्या मात्र कावळ्यांचा दुष्काळ असल्याने पितृ पक्षात नैवेद्य कुणाला दाखवायचा? हा प्रश्न उभा राहिला आहे.
मावळ तालुक्यात सध्या सर्वत्र पितृ पंधरवडा सुरू आहे. यात पुर्वजांच्या मृतात्म्यास मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी पितरे घातली जातात. परंपरेनुसार यामध्ये पिंडदान करण्यात येते.
त्याकरिता ‘काकस्पर्श’ (कावळा) महत्वाचा असतो. परंतु हल्ली शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील वातावरणीय बदल, वाढते शहरीकरण – औद्योगिकीकरण यामुळे कावळ्यांची काव – काव हरवत चालली आहे.
पूर्वी कावळ्यांचे वास्तव्य अधिक असायचे. त्यामुळे पिंडदानासाठी नैवद्य ठेवताच कावळे तो उचलून न्यायचे. सध्या मात्र परिस्थिती बिकट झाली आहे.
नैवद्य ठेवल्यानंतरही कितीतरी वेळ कावळा यायची प्रतीक्षा करावी लागते. पिंडदान करणारे कुटुंब कित्येक वेळ प्रतीक्षेत घालवितात. एकेकाळी नैवद्य ठेवला की कावळ्यांची झुंबड उडायची पण आता कावळ्याचीच वाट पाहावी लागते, असे काही वयोवृद्ध नागरिक सांगत आहेत.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले
कावळा हा निसर्गचक्रातील एक प्रमुख पक्षी आहे. पिकावरील कीटक, शेतजमिनीवरील कीडे, अळी खावून जगणारा हा पक्षी पिकांवरील औषध फवारणीमुळे शेतशिवाराकडे फिरकेनासा झालाय.
दुसरीकडे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यामुळेही कावळे गाव, शहरापासून दूर गेल्याचे दिसतात. ज्या ठिकाणी निसर्ग आहे, शांतता आहे, तिथे मात्र आजही कावळ्यांचे चांगले अस्तित्व आहे.





