पिंपरी | गणरायासमोर गावोगावी हरिनामाचा गजर

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये गणेश उत्सवामध्ये घरोघरी, देवळात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. गणराया समोर भजनाचा जागर ठिकठिकाणी सुरू आहे. भाविक, गणेशभक्त, नागरिक सध्या गणेश उत्सवात भजनात दंग झालेले दिसत आहेत.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव काळात भजनाची परंपरा आजही टिकून आहे. गावांगावात सायंकाळी मंदिरांत भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तालुक्यात अनेक प्रसिद्ध भजनी मंडळे आहेत.
भजनी मंडळी दररोज सायंकाळी घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती, मंदिरातील गणराया समोर हरिनामाचा गजर करत आहेत. त्यामुळे गावखेड्यातील नागरिकांनी अजुनही जुणेपण टिकवून ठेवलेले दिसत आहे.
महिनाभर आधी तयारी सुरू –
गणपती बाप्पाच्या आगमना अगोदर पासून भजनी मंडळे सराव करत असतात. वाद्ये दुरूस्त करणे, आवश्यकता असल्यास नवीन घेतली जातात. जेणेकरून दहा दिवसाच्या हरिनामाच्या गजरात कोणताही खंड पडायला नको.
वेगवेगळ्या गवळणी, अभंग गाऊन गणराया पुढे भक्तिमय वातावरण निर्माण केले जाते. दररोज बाप्पा समोर हरिनामाचा जागर होतोय. यात भजनी मंडळी, कलाकारांना उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळते, जी खूप मोलाची वाटते.
सध्या महिला भजनी मंडळी देखील हरिनामाचा गरज करण्यात आघाडीवर आहेत. गणेश उत्सव काळात महिला भजनी मंडळाकडून संगीत भजन गाऊन बाप्पाची आराधना केली जाते.
केवळ वृद्ध मंडळी नाही तर नोकरी व्यवसाय निमित्त शहरात वास्तव्यास असलेली चाकरमानी सुद्धा गणेशोत्सवाच्या काळात अभंग गात बाप्पा चरणी लीन होत आहेत.





