Pimpri : गावी जाताय? सावधान… कुलूपबंद घरांवर चोरांची ‘तिसरी नजर’!
दिवाळीच्या सुट्ट्यांत ‘चोरट्यांची दिवाळी’

पिंपरी – रोषणाईचा झगमगाट, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावाकडे निघालेली चाकरमान्यांची गर्दी… दिवाळीच्या या उत्साहावर डोळा ठेवून सराईत घरफोड्यांच्या टोळ्या शहरात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बंद फ्लॅट्स, सोसायट्या आणि सलग काही दिवस कुलूपबंद राहणाऱ्या कंपन्या दरवर्षी चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’वर येतात. सणासुदीमुळे घरांमध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने, लक्ष्मीपूजनाची रोख रक्कम आणि एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये उघड्यावर पडलेला महागडा कच्चा माल हे दरवर्षीच चोरट्यांचे मुख्य लक्ष्य ठरत आहे.
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील हजारो नागरिक सहकुटुंब मूळ गावी किंवा पर्यटनासाठी रवाना होतात. घराला बाहेरून लटकणारे कुलूप, दारात साचलेला वृत्तपत्रांचा ढीग, न उचललेली दूधाची पाकिटे आणि बाल्कनीतील अंधार पाहून रेकी करणाऱ्या टोळ्या घर रिकामे असल्याचा अंदाज बांधतात.
दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त बहुतांश नागरिक लॉकरमधून दागिने घरी आणतात. शिवाय, फटाक्यांच्या प्रचंड आवाजात कडी-कोयंडा तोडल्याचा किंवा काच फुटल्याचा आवाजही शेजाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सोसायट्यांमध्ये वाढलेली कुरिअर, पार्सल आणि अनोळखी व्यक्तींची वर्दळ चोरांच्या पथ्यावर पडत असल्याने घरफोडीचा धोका दुप्पट झाला आहे.
भोसरी, चिंचवड, तळवडे, चाकण आणि चिखली औद्योगिक पट्ट्यातील बहुतांश लहान-मोठे कारखाने दिवाळीनिमित्त २ ते ५ दिवस पूर्णपणे ठप्प असतात. उत्पादन थांबल्यामुळे या परिसरातील रस्ते आणि आवारात रात्रीच्या वेळी शुकशुकाट पसरतो. कंपन्यांमधील तांबे (कॉपर), ॲल्युमिनियम, पितळ, महागड्या केबल्स, मशिनरी आणि टूल्स चोरून भंगार बाजारात विकणाऱ्या टोळ्या अशाच सुट्ट्यांची वाट पाहत असतात.
अनेक कारखान्यांमध्ये सणासुदीत सुरक्षारक्षकांची कमतरता असते, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद असणे किंवा मागील भिंतीला लागून अंधार असणे यांसारख्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा ‘स्क्रॅप सिंडिकेट’कडून उचलला जातो.
‘खाकी’समोर रात्रीच्या गस्तीचे मोठे आव्हान
शहरातील घरफोड्या आणि चोऱ्यांची मालिका रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांना रात्रीच्या गस्तीची व्याप्ती वाढवावी लागणार आहे. मध्यरात्री १ ते पहाटे ५ या ‘क्रिटिकल’ वेळेत बीट मार्शल आणि ‘डायल ११२’ च्या वाहनांनी सायरन व फ्लॅशरसह सोसायट्या आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.
- रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे चेकिंग: जामिनावर सुटलेले, तडीपार आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत निष्णात असलेल्या स्थानिक तसेच आंतरजिल्हा टोळ्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे.
- भंगार बाजारावर वचक: औद्योगिक भागातील संशयित स्क्रॅप डीलर्स (भंगारवाले) आणि अनधिकृत सराफांच्या हालचालींची गुप्त खबऱ्यांमार्फत चौकशी करणे.
- एएनपीआर व नाकाबंदी: शहराच्या प्रवेश-निर्गमन मार्गांवर ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’ (ANPR) कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयित वाहने ट्रॅक करणे आणि उपनगरांत अचानक नाकाबंदी लावणे आवश्यक आहे.
घरफोड्या आणि चोऱ्या टाळण्यासाठी ‘१० गोल्डन रूल्स’
- दागिने व कॅश बँकेत सुरक्षित ठेवा: लक्ष्मीपूजन पार पडताच शिल्लक रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने तातडीने बँकेच्या लॉकरमध्ये जमा करा; कपाटात ठेवणे टाळा.
- शेजारी अन् बीट पोलिसांना पूर्वकल्पना: गावी जाताना शेजारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील बीट मार्शलला घर बंद असल्याची अधिकृत कल्पना द्या.
- दूध-वर्तमानपत्र तात्पुरते बंद करा: घराबाहेर पडण्यापूर्वी वर्तमानपत्र आणि दूधाची डिलिव्हरी थांबवा, जेणेकरून दारासमोर ढीग साचून घर रिकामे असल्याचे दिसणार नाही.
- घरात ‘स्मार्ट लाइट’ ठेवा: संपूर्ण घरात काळोख ठेवण्याऐवजी एखादा कमी दाबाचा दिवा किंवा ‘टायमर लाइट’ चालू ठेवा, ज्यामुळे घरात हालचाल असल्याचा भास होतो.
- सोशल मीडिया ‘चेक-इन’ टाळा: सहलीचे फोटो, प्रवासाचे स्टेटस किंवा घर रिकामे असल्याची माहिती रिअल-टाइममध्ये सोशल मीडियावर शेअर करू नका.
- सेंट्रल लॉक आणि खिडक्यांची तपासणी: साध्या कुलूपांऐवजी मजबूत सेंट्रल लॉक वापरा; बाल्कनी, डक्ट, स्लाइडिंग खिडक्यांच्या आतल्या कड्या नीट तपासून घ्या.
- कंपन्यांमध्ये जादा सुरक्षा रक्षक नेमा: सलग सुट्ट्यांच्या दिवसांत सुरक्षारक्षकांची संख्या कमी न करता कारखान्यांच्या आवारात रात्रगस्त वाढवा.
- मौल्यवान धातू बंदिस्त गोदामात: कॉपर केबल्स, पितळ आणि महागडे स्पेअर पार्ट्स उघड्या शेडमध्ये न ठेवता अंतर्गत कुलूपबंद गोदामात ठेवा.
- सीसीटीव्ही व डीव्हीआर बॅकअप सक्रिय ठेवा: सोसायट्या आणि कंपन्यांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे, मोशन सेन्सर्स आणि डीव्हीआरचे रेकॉर्डिंग सुरळीत चालू असल्याची खात्री करावी.
- संशयितांची तात्काळ माहिती द्या: सोसायटी किंवा कंपनी परिसरात रेंगाळणाऱ्या अनोळखी व्यक्ती, नंबर प्लेट नसलेल्या संशयित दुचाकी आढळल्यास क्षणाचाही विलंब न करता ‘डायल ११२’ वर संपर्क साधा.
Crime : ईश्वरपुरात धारदार शस्त्रांनी युवकावर हल्ला; 24 तासांत दोघे अटकेत





