Crime : ईश्वरपुरात धारदार शस्त्रांनी युवकावर हल्ला; 24 तासांत दोघे अटकेत
Crime : ईश्वरपूरच्या कामेरी नाका परिसरात पूर्ववैमनस्यातून सूरज कांबळे याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

Crime : (ईश्वरपूर) – कपड्याच्या दुकानातील वाद आणि पूर्वीचा प्रेमविवाह मोडल्याच्या कारणातून झालेल्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला करून ३१ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना ईश्वरपूर येथील कामेरी नाका परिसरात रविवारी (दि. १) रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांत दोघा संशयितांना अटक केली आहे.
सूरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०, दोघेही रा. आंबेडकरनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरजने २०१८ मध्ये गुपचूप प्रेमविवाह केला होता. अंकितने या विवाहाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिल्याने विवाहाला विरोध झाला. त्यातून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होता.
रविवारी रात्री कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या सूरजचा साहिलसोबत वाद झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी अंकितने सूरजला कामेरी नाक्यावर बोलावले. तेथे पुन्हा वाद वाढला आणि अंकित व साहिल यांनी धारदार शस्त्रांनी सूरजवर हल्ला केला. डोक्यावर आणि छातीवर गंभीर वार झाल्याने मोठ्या रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पसार झालेल्या दोघांना पोलिसांच्या पथकाने अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.





