मुंबई – छोट्यापडद्यावर गाजत असलेली स्टार प्रवाहची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली जाते. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. मात्र, सध्या ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री स्वाती भदवेने प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
“प्रोडक्शन कंट्रोलरने माझ्याकडे फोन नंबर मागितला होता. मी पुण्यातून काम करु शकते की नाही असे त्याने मला विचारले. मी हो… म्हणत कुठूनही काम करु शकते असे सांगितले. त्यानंतर त्याने मला तुझ्याकडून काही तरी हवे आहे असे सांगितले.
मी त्याला कमिशन देईन असे सांगितले. पण त्याने नकार देत म्हटले की मला आणखी काही तरी हवे आहे. त्याला माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते आणि मला ते मान्य नव्हते..” असं स्वातीने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान म्हंटलं आहे.