Sanjay Raut : तुरुंगात असताना विषप्रयोग झाला असावा; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ म्हणाले “राहुल गांधींनी…”
Sanjay Raut : या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना तातडीने ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तुरुंगात असताना आपल्या जेवणात विष मिसळले गेले असावे, अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली आहे.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याला ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दहा दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना तातडीने ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
‘तुरुंगात जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता’ (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले की, समाजासाठी लढणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या नेत्यांना तुरुंगात असताना त्यांच्या जेवणातून किंवा खाण्यापिण्यातून त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरुंगात असलेल्या अनेक नेत्यांच्या बाबतीत अशी शंका निर्माण होऊ शकते.
“राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला अलर्ट केले आहे. त्यांनी मला टॉक्सिक टेस्ट करून घेण्यास सांगितले आहे. मी ती टेस्ट करणार आहे.” असे संजय राऊत यांनी सांगितले.
तुरुंगात असताना प्रकृती खालावलेल्या काही नेत्यांशी आपण चर्चा केली होती. त्यावेळी काही गोष्टी आपल्या लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच आपली प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सल्ल्याचा राऊतांचा दावा
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. “तुमच्या शरीरामध्ये विष वाढीचा प्रकार दिसत आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने टॉक्सिक टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. तुरुंगात गेलेल्या इतर काही नेत्यांची प्रकृतीही अशाच प्रकारे खालावली असून ते आजारी पडले आहेत.” असे राहुल गांधी यांनी म्हटल्याचा दावा राऊत यांनी केला.
दरम्यान, तुरुंगात असताना आपल्यावर विषप्रयोग झाला असावा, या संजय राऊत यांच्या दाव्याला अद्याप कोणतेही वैद्यकीय किंवा स्वतंत्र पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र, या दाव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.






