प्रियकराचे अमानवी कृत्य..! प्रेयसीची हत्या करून मृतदेहावर केला लैंगिक अत्याचार

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे. काल (दि. ०८) घडलेल्या अत्याचार आणि खून प्रकरणात आरोपींनी मृतदेहावरही लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. एका नराधमाने त्याच्या विवाहित प्रेयसीशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी रोहित गणेश टेकामला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विवाहित महिला हुडकेश्वर खुर्द येथे राहत होती. ती मूळची मध्य प्रदेशची आहे आणि सहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पतीसोबत नागपूरला आली होती. सकाळी ढाब्यावर काम केल्यानंतर तिचा नवरा मध्यरात्री थेट घरी येत असे. दरम्यान, आरोपी बांधकाम अभियंता रोहित टेकाम दोन वर्षांपूर्वी हुडकेश्वर खुर्दमध्ये एका इमारतीच्या बांधकामाचे काम करत होता. त्यावेळी पीडित आणि रोहितची भेट झाली.
दोघांमधील प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर, तिचा नवरा घरी नसताना रोहित नेहमीच तिला भेटायला येत असे. गुरुवारी (६ फेब्रुवारी) तिचा पती कामावर गेल्यानंतर पीडितेने रोहितला घरी बोलावले असता रोहित महालगाव कापसी येथील काम सोडून घरी आला.
शारीरिक संबंधास नकार दिल्याने हत्या
रोहित आणि पीडितेने दारू प्यायली आणि जेवणही केले. नंतर रोहितने पीडितेकडून शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रोहितने तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर पीडितेच्या मृतदेहावर अत्याचार करून पळून गेला. संध्याकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय अहवालात मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडितेच्या मोबाईल फोनच्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी रोहितला अटक केली आहे.





