Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या ‘पलाश मुच्छल’ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा
संगीतकार पलाश मुच्छल याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah) हिने त्याला उघड पाठिंबा दिला आहे.

Daisy Shah – संगीतकार पलाश मुच्छल याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने त्याला उघड पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी पलाशचे एका प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूशी ठरलेले लग्न अचानक रद्द झाले.
दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली येथे होणाऱ्या या लग्नाचे काही समारंभही पार पडले होते; मात्र शेवटच्या क्षणी ते मोडल्याने विविध चर्चा आणि आरोप समोर आले. दोघांनीही नंतर सोशल मीडियावर लग्न न होण्याची माहिती दिली.
दरम्यान, ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत डेझी शाहने ( Daisy Shah) पलाशचे समर्थन करत त्याला “खूप चांगला माणूस” असे संबोधले. ती म्हणाली की, तिची आणि पलाशची ओळख त्याची बहीण, गायिका पलक मुच्छल हिच्यामार्फत झाली.
पलकने Jai Ho या चित्रपटासाठी गाणे गायले होते. त्या निमित्ताने पलाश आणि त्याच्या कुटुंबाशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. “त्यांचे कुटुंब अत्यंत साधे आणि देवावर श्रद्धा ठेवणारे आहे,” असेही डेझीने सांगितले.
“पलाश हा खरोखरच एक चांगला माणूस आहे. मी त्याला काही वेळा भेटले आहे. मी अनेकदा पलकच्या घरी वाढदिवस आणि गणपती दर्शन, पार्ट्यांसाठी जाते. या कार्यक्रमांना माझी आणि पलाशची भेट होत असते. त्यावेळीच मला कळलेले की तो एक संगीतकार आणि दिग्दर्शक आहे.” असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.
दरम्यान, अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah )आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या प्रोजेक्टमध्ये पलाश मुच्छल दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. वैयक्तिक आयुष्यावरील वादाच्या काळातही व्यावसायिक पातळीवर त्याला पाठिंबा देत डेझीने सकारात्मक भूमिका घेतली आहे.






