…त्याने मृत्यूलाही दिला चकवा ! 128 तास ढिगाऱ्याखाली अडकलेला चिमुकला बचावला

हाताय: तुर्कीमध्ये झालेल्या भयंकर भूकंपामुळे विनाश आणि नैराश्य पसरलेल्या वातावरणात नवनिर्मितीचा अंकुर सापडला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत तब्बल 128 तासांपासून मातीखाली अडकलेल्या बाळाला सुखरूप बाहेर काढले. तुर्की आणि सीरिया मधील विनाशकारी भूकंपांमध्ये सुमारे 29 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अनेक नागरिक बचावल्याच्या घटना समोर येत आहेत. आता बचाव पथकाने सुमारे 128 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढलं आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी प्रलयकारी भूकंप झाला, यानंतरही अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. ढिगाऱ्याखाली अडकून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तुर्कस्तानमध्ये बचाव कार्यादरम्यान ‘जाको राखे सैयां मार सके ना कोई’ ही म्हणही खरी ठरत आहे. शेकडो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून लोक सुखरूप बचावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुर्कीतील हाताय येथे शनिवारी ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
A two-month-old baby was rescued from under the rubble 128 hours after the earthquake in #Turkey.
A miracle happened in Kahramanmaraş.
📰 Hurriyet pic.twitter.com/QUL5MkXV5W
— NEXTA (@nexta_tv) February 11, 2023
मृत्यूवर मात केलेल्या या चिमुकल्यासाठी जमावाने टाळ्या वाजवल्या. या चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भूकंपानंतर सुमारे 128 तासांनी हे बाळ सुखरुप सापडले आहे.
भूकंपातून अनेक जण बचावले आहेत. पण आता अनेक भागात अन्नाचे संकटही निर्माण झाले आहे. अनेक लोकांचा ढिगाऱ्याखाली अडकून भूक आणि थंडीमुळे मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, भारतीय NDRF आणि तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.





