Revenue Department : हवेली, खेड प्रांताधिकारी कार्यालयांतील एजंटगिरीच्या तक्रारी; महसूलमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
Revenue Department : हवेली आणि खेड प्रांताधिकारी कार्यालयांतील एजंटगिरी व गैरव्यवहाराच्या तक्रारींवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

Revenue Department : जिल्ह्यातील हवेली आणि खेड प्रांताधिकाऱ्यांविषयी आणि त्यांच्या कार्यालयातील एजंटगिरीबाबत थेट तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई निश्चित केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
जमिनींच्या विविध वादांवर निकाल देण्यापूर्वी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांचे एजंट पक्षकारांशी संपर्क साधतात. त्यांना तडजोडीसाठी राजी करून मोठ्या प्रमाणावर ‘अर्थ’पूर्ण व्यवहार आणले जातात.
याशिवाय, प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये खासगी माणसे बसवून त्यांच्यामार्फत दस्त आणि कागदपत्रांची देवाणघेवाण करणे, अशा अनेक गंभीर तक्रारी थेट सरकारकडे पोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतल्याने संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दोषींवर कारवाई –
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की हवेली आणि खेड प्रांत या दोन्ही ठिकाणांविषयी माझ्याकडे थेट तक्रारी आल्या आहेत. या प्रांताधिकाऱ्यांच्या काही खासगी एजंटांच्या माध्यमातूनच कामे, सुनावण्या आणि गैरव्यवहार चालत असल्याचे तक्रारींमध्ये समोर आले आहे.
या प्रकाराची माहिती घेत असून, शेतकरी प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करणार आहे. सविस्तर चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.





