Harshvardhan Sapkal : वातावरण तापलं! ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाआधी पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ संतापले म्हणाले “भाडोत्री गुंड पाठवून…”
Harshvardhan Sapkal : आता या प्रकारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Harshvardhan Sapkal : पुण्यामध्ये लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ हा कार्यक्रम आज होणार आहे. त्याअगोदर काल रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआयमध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आता या प्रकारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“पुण्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून मोठा असंतोष आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच भाडोत्री गुंड पाठवून हा कार्यक्रम उधळण्याचा आणि स्टंट करण्याचा कट रचला गेला आहे.” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सीईओपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा अभविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. फक्त राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांना कोणी दिला आहे? असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असेल तर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही, असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री पुण्यातील COEP विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये NSUI आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री NSUIच्या काही विद्यार्थिनी COEP कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थिनींना राहुल गांधी यांच्या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत होत्या. यावेळी त्यांना कॅम्पसमध्ये कोंडून ठेवल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरली. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते कॅम्पसकडे धावले.
दरम्यान, अभाविपच्या कार्यकर्त्यांचाही एक गट COEPच्या गेटवर पोहोचला. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती तणावपूर्ण असतानाच दोन्ही गटांकडून परस्पर मारहाणीचे आरोप करण्यात आले. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आनंद दुबे आणि रिहान बाबुडे यांना उपचारासाठी जवळच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयातही धाव घेतली.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी फोनवरून कॅम्पसमधील विद्यार्थिनींकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतल्याचे समजते. या घटनेमुळे ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.






