हौसेला मोल नसतं! गुजराती व्यावसायिकाच्या मुलाची लग्नपत्रिका तब्बल ४ किलोची; एका पत्रिकेची किंमत सात हजार रुपये!

नवी दिल्ली : भारतात लग्नसोहळा हा मोठ्या धुमधडाक्यात करणं हे प्रतिष्ठेचे समजले जाते. गरिबातील गरीब लोकही आपल्या घरच्या लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसतात. त्यातच श्रीमंत घरच्या लोकांच्या लग्नाविषयी तर बोलायला नकोच..कारण त्यांच्या घरच्या लग्नाची चर्चा वर्षानुवर्षे होते. सध्या सोशल मीडियावर गुजराती व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नाची चर्चा आहे.
गुजराती व्यापारी मुलेशभाई उकनी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ४ किलोची लग्नपत्रिका छापली आहे. मुलेशभाई उकनी हे द्वारका मंदिराचे विश्वस्त देखील आहेत. ही लग्नपत्रिका फिकट गुलाबी रंगाची असून दिसायला खूप सुंदर आहे. बॉक्ससारखी ही लग्नपत्रिका दिसते. उघडल्यावर आतमध्ये मलमलच्या कापडाच्या चार लहान पेट्या आहेत. या पेट्यांमध्ये सुका मेवा ठेवण्यात आला आहे. या कार्डचे एकूण वजन चार किलो २८० ग्रॅम आहे. एका लग्नपत्रिकाची किंमत ७ हजार सांगितली जात आहे.
कार्डमध्येही एकूण ७ पाने आहेत. यामध्ये तीन दिवसीय विवाह कार्यक्रमाचा तपशील लिहिला आहे. काजू, बेदाणे, बदाम, चॉकलेट्स लग्नपत्रिकेचे पेटी दिली आहे. १४ नोव्हेंबरपासून राजस्थानच्या जोधपूरमध्ये लग्नसोहळा सुरू होणार आहे.
सर्व प्रथम, द्वारकाधीशच्या कृष्णाचे चित्र लग्नपत्रिकेमध्ये दिसते. मुळेशभाई उकनी आणि त्यांच्या कुटुंबीयांची कान्हाजीवर खूप श्रद्धा आहे. यामुळे त्यांनी लग्नपत्रिकेमध्ये त्यांचे चित्र छापले आहे. लग्नपत्रिकाच इतकी भव्य असताना लग्नसोहळा किती भव्य असेल याची उत्सुकता लोकांना आहे.





