हाथरस प्रकरणाचा मुख्य आरोपी हार्ट पेशंट; प्रकृती खराब असल्यामुळे नंतर चौकशी होणार

हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याच्या अटकेसाठी १ लाख रूपयांचा इनाम जाहीर केल्याबद्दल त्याचे वकिल डॉ. ए. पी. सिंह यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्याला एफआयआरची प्रत मिळाली असून तपास संस्थांवर आपला पूर्ण विश्वास आहे.
देव प्रकाश मधुकर हार्ट पेशंट आहे आणि त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती बरी झाल्यावर आम्ही त्याला पोलीस आणि एसआटीसमोर पुढील योग्य कारवाईसाठी हजर करू असे सिंह यांनी म्हटले आहे.
ए.पी. सिंह म्हणाले की देव प्रकाश मधुकरची कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. आम्ही कोणतीही कायदेशीर कारवाई अथवा अन्य काही करणार नाही. दरम्यान, घटना घडली त्या दिवसापासून देव प्रकाश मधुकर घरी गेलेला नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहिती नाही. चेंगराचेंगरीची घटना झाल्यावर तो बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते आहे व चेंगरीचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मधुकर याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार तो ज्यूनिअर इंजिनिअर म्हणून काम करायचा आणि भोले बाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूरजपाल याचा कट्टर अनुयायी होता. गुरूवारी जेंव्हा पोलिसांनी त्याला हुडकण्यासाठी त्याचे घर गाठले तेंव्हा तेथे मोठे कुलूप लागले होते. ज्या भागात त्याचे घर आहे ती एक दलित वस्ती आहे व तेथपर्यंत पोहोचण्यासाठी जेमतेम पाच मिनीटे लागतात.
दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये याबाबत वेगवेगळी मते आहेत. काही जणांच्या मते मधुकर याच्या चुकीमुळेच चेंगराचेंगरीची घटना घडली तर काही जणांचा असा दावा आहे की भोले बाबाला वाचवण्यासाठी मधुकरला मुख्य आरोपी करत बळीचा बकरा बनवला जात आहे.
मधुकरचा बचाव करताना कायद्याचे शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी अखिलेश म्हणाला की सत्संगला येण्यासाठी मधुकर काही सगळ्या लोकांच्या घरी आमंत्रण द्यायला गेला नव्हता. तेथे जी गर्दी झाली होती ती बाबामुळे झाली होती व बाबा मात्र घटना घडल्यानंतर तेथून पसार झाला. तर एका महिलेने मात्र मधुकरच्या विरोधात आपले मत मांडले.
ती म्हणाली की जर तुम्ही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असाल आणि पोलिसांना आत जाण्याची परवानगी देत नसाल व तुमचे स्वयंसेवक सगळे पार पाडतील असे तुम्हाला वाटत असेल तर यापेक्षा वेगळे काही घडण्याची आपण काय अपेक्षा करू शकतो? अन्य एका महिलेच्या म्हणण्यानुसार तुम्ही सरकारी अधिकारी अथवा पोलिसांना आत जाण्याची परवानगी का देत नाही? याचाच अर्थ तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात.





