‘हाथरस दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींद्वारे करावी’ ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Hathras Stampede । उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. आज सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणारा उल्लेख करण्यात आला. मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना या प्रकरणाची माहिती द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या सूचनेनंतर याचिकाकर्त्याने मुख्य न्यायमूर्तींना मेलही पाठवून लवकर सुनावणीची मागणी केली आहे. हाथरस दुर्घटनेची चौकशी करणारी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करावी, असे या मेलमध्ये म्हटले आहे. अशा सार्वजनिक सभा व कार्यक्रमांमध्ये ज्या मोठ्या संख्येने लोक जमतात अशा ठिकाणी भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना मुख्य न्यायमूर्तींना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी Hathras Stampede ।
सरन्यायाधीशांना पाठवलेल्या मेलमध्ये उत्तर प्रदेश सरकारला हाथरस घटनेचा स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे पुढे म्हटले आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या सर्व व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी नियमावली बनवावी, असेही याचिकेत म्हटले आहे. तसे नियम बनविण्याच्या सूचना राज्य सरकारला द्याव्यात, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी हाथरसला दिली भेट Hathras Stampede ।
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरसआणि अलीगडला भेट दिली. हाथरस येथील सत्संगात ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यातील बहुतांश लोक या दोन जिल्ह्यांतील रहिवासी होते. राहुल यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. राहुल म्हणाले की, पीडित कुटुंब अत्यंत गरीब असल्याने नुकसानभरपाईची रक्कम वाढवली पाहिजे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी. सरकारने मृतांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
एसआयटीचा अहवाल मुख्यमंत्री योगींना सादर
हाथरस दुर्घटनेचा एसआयटी अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर करण्यात आला आहे. 15 पानांच्या या अहवालात डीएम आणि एसपीसह सुमारे 100 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या अहवालात काही राजकीय लोकांचीही नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नेत्यांना निवडणूक जिंकून देण्यात बाबांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अहवालात राजकीय षडयंत्र असल्याचीही चर्चा आहे. बाबांच्या सेवकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.





