Hasan Mushrif : पदव्युत्तर वैद्यकीय, दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

Hasan Mushrif : पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी सर्व प्रवेश केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.
राज्य शासनाने ५ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करून पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाराष्ट्र व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेशाचे विनियमन) नियम, २०२६ अधिसूचित केले आहे. नव्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रियेतील संस्थास्तरीय फेरी बंद करण्यात आली आहे.
यापुढे संस्थात्मक कोटा आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) कोट्यातील जागांसह सर्व प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाद्वारे करण्यात येतील. संस्थात्मक कोट्यातील (Hasan Mushrif) जागांसाठी उमेदवारांच्या पात्रतेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या; मात्र राज्याबाहेरील संस्थेतून पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही या जागांसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्राबाहेरील उमेदवार आणि परदेशी वैद्यकीय पदवीधारकांनाही खासगी महाविद्यालयांतील संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्रता देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करताना नोंदणीची अंतिम तारीख हा कट-ऑफ दिनांक मानण्यात येणार आहे. या तारखेला आवश्यक पात्रता पूर्ण नसलेल्या उमेदवारास संबंधित शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर पात्रता प्राप्त झाल्यास ती त्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Hasan Mushrif) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.






