Haryana Election : विनेश फोगट आणि बजरंग पुनियाही विधानसभेच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून तिकिट कन्फर्म

Haryana Election – हरियाणा विधानसभा निवडणूक यावेळी जिंकायचीच अशा इर्षेने कॉंग्रेस पक्ष मैदानात उतरताना दिसत असून माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र हुडा यांना तिकिटवाटपात पूर्ण मुभा दिली गेली असल्याचे वृत्त आहे. एका माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार कोणाशी आघाडी करायची याचीही राहुल गांधी यांनी हुडा यांना पूर्ण मोकळीक दिली आहे.
त्यामुळे राहुल गांधी यांची जरी राज्यात आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्याची इच्छा असली तरी हुडा यांना त्यांच्यापेक्षा राज्यातील परिस्थितीची अधिक सखोल माहिती असल्यामुळे ते आपला सोबत घेण्यास फारसे उत्सूक नसल्याचे समजते.
दरम्यान, कॉंग्रेसकडून महिला कुस्तीपटू विनेश फोगटशी संपर्क साधण्यात आला असून कोणत्या जागेवरून लढण्याची इच्छा आहे अशी विचारणा करण्यात आली आहे. तूर्तास बधरा आणि दादरी हे दोन पर्याय पक्षाने विनेशसमोर ठेवले आहेत. स्वत: विनेशनेही आपण जी जागा मागू तेथून आपल्याला उमेदवारी दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनियानेही बादली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून तिकिट मागितले आहे. मात्र त्याला बहादुरगढ आणि भिवानी हे दोन पर्याय देण्यात आले आहेत. आता निर्णय त्याच्यावर सोपवण्यात आला आहे. तथापि, बजरंग आणि विनेश या दोघांनाही रिंगणात उतरवण्याचा पूर्ण निश्चय कॉंग्रेसने केला आहे.
तसे करून महिला कुस्तीपटूंसोबत जे घडले त्याचे मतदारांना स्मरण करून देत भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे. लालू प्रसाद यादव यांचे जावई चिरंजीव राव यांचेही रेवाडी मतदारसंघातून तिकिट फायनल झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.





