Haryana Election : हरियाणात भाजपचे संख्याबळ वाढले; दोन अपक्ष आमदारांचा पक्षामध्ये प्रवेश

Haryana Election – हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने घवघवीत यश मिळविले आहे. या यशासह पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबिज केली आहे. दरम्यान, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दोन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राज्यातील त्यांचे संख्याबळ आणखी वाढले आहे.
अपक्ष आमदार देवेंद्र काड्यान आणि राजेश जून यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हरियाणा प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्या उपस्थितीत दोन्ही आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आहे. हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेपर्यंत पोहोचू शकला नसला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली.
नायब सिंग सैनी यांनी घेतली मोदींची भेट
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.
गेल्या 10 वर्षात त्यांनी राबविलेल्या विविध योजना आणि धोरणामुळे गरीब, शेतकरी आणि तरुणांना फायदा होत आहे. याचाच परिणाम म्हणजे मोदीजींची लोकप्रियता देशभरात आहे. त्यामुळे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने जिंकून आली आहे.





