Haryana Election: ‘हरियाणातील निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपची मागणी’; निवडणूक आयोगाला पाठवले निवेदन

Haryana Election – भारतीय जनता पक्षाने हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण त्या काळात जोडून सार्वजनिक सुट्ट्या असल्याने ही तारीख पुढे ढकलण्याची भाजपची मागणी आहे.
भाजपच्या या मागणीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका प्रदेश भाजप नेत्याने सांगितले की पक्षाच्या राज्य युनिट प्रमुखांनी निवडणूक आयोगाला तशी विनंती करणारे पत्र पाठवले आहे. हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी पुष्टी केली की आयोगाला ई-मेलवर भाजपच्या निवेदनाची प्रत मिळाली आहे.
भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य वरिंदर गर्ग म्हणाले, आमच्या असे निदर्शनाला आले आहे की १ ऑक्टोबरची विधानसभा निवडणुकीची तारीख शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या आधी आहे आणि त्यानंतर काही सुट्ट्या आहेत ज्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो कारण लोक सुट्टीवर जातात.
आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. अधिक चांगल्या मतदानासाठी, सुट्टीचा दिवस संपला की कोणतीही नवीन तारीख योग्य होईल असे गर्ग यांनी शनिवारी पीटीआयला फोनवरून सांगितले.
शनिवार (२८ सप्टेंबर) हा अनेकांसाठी सुट्टीचा दिवस आहे, तर रविवार हा नियमीत सुट्टीचा दिवस आहे. राज्यात १ ऑक्टोबर रोजी मतदानाची सुट्टी आहे, त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे, ही सुट्टी आहे आणि ३ ऑक्टोबरलाही महाराजा अग्रसेन जयंतीची सुट्टी आहे असे ते म्हणाले.
या जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे लोक मतदान न करता बाहेर गावी जातात असा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही ही मागणी केली आहे असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे.





