हरियाणा आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : हरियाणातील कॉंग्रेसच्या पराभवामुळे त्या पक्षाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील आशा अंधूक झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तो दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी सपशेल फेटाळून लावला. हरियाणा आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
चव्हाण यांनी त्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी लोकसभा निवडणूक निकालांचा आधार घेतला. हरियाणात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत. त्यातील निम्म्या-निम्म्या जागा कॉंग्रेस आणि भाजपने जिंकल्या. मात्र, महाराष्ट्रातील निकालाचे प्रमाण 65 टक्के (महाविकास आघाडी) आणि 35 टक्के (महायुती) असे आहे. तो फरक अतिशय मोठा आहे. त्याशिवाय, महाराष्ट्र आणि हरियाणातील सामाजिक समीकरणे वेगवेगळी आहेत, असे त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाईल, असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारे सर्वांत मोठ्या ठरलेल्या पक्षाला मुख्यमंत्री निश्चित करण्याची संधी मिळते. त्या प्रथेमध्ये कुठला बदल होण्याची शक्यता वाटत नाही. अर्थात, यावेळी त्या फॉर्म्युल्यात बदल करायचा असल्यास आघाडीतील घटक पक्ष एकत्रितपणे तसे ठरवू शकतात. अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल अशा आशयाची भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
चव्हाण यांना ते स्वत: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला. उत्तरादाखल त्यांनी सद्यस्थितीत तो प्रश्न निरर्थक असल्याचे म्हटले. सर्वप्रथम निवडणुकीत जिंकावे लागेल. आमच्या आघाडीचे प्राधान्य निवडणुकीत यश मिळवण्याला आहे, असे त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत कुठले मतभेद नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच, आघाडीला बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.





