अकोला : खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जात आणि धर्म विचारून केलेल्या अमानुष हल्ल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय स्थिती उघड झाली आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची गरज असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री ठरले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली. मंगळवारी सकाळी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोहन पैठणकर यांची भेट घेतल्यानंतर सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खामगाव येथे रोहन पैठणकर या तरुणाला त्याची जात विचारून ‘गाय चोर’ ठरवत क्रूर मारहाण करण्यात आली आणि त्याला निर्वस्त्र करण्याचाही प्रयत्न झाला. हा केवळ गुन्हा नसून, समाजात जातीय विद्वेष पसरवणारा गंभीर प्रकार आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आरोप केला की, राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आता सामान्य झाल्या असून, महायुती सरकार या घटनांना प्रोत्साहन देत आहे. पोलिस प्रशासन निष्क्रिय झाले असून, गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. या गंभीर घटनेनंतरही बुलढाणा जिल्हा प्रशासनाने पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही किंवा त्यांची विचारपूस केली नाही, हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे द्योतक आहे, असे सपकाळ म्हणाले. या भेटीवेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, अकोला शहर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, बबनराव चौधरी, महेंद्र गवई, धनंजय देशमुख, रामविजय पुरुंगळे, तेजेंद्र चौहान, डॉ. जिशान हुसैन, कपिल रावदेव, कपिल ढोके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.