Gargi Sapkal – छत्रपती शिवाजी महाराज यांची तूलना टिपू सुलतानशी केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र शब्दात टीका होत आहे. आपल्या वडिलांवरती होत असलेल्या टीकेला आता हर्षवर्धन सपकाळ यांची लेक गार्गी सपकाळ यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ एक भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. गार्गी सपकाळ म्हणाल्या, माझ्या वडिलांचे वक्तव्य स्पष्ट आणि संदर्भासह होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही, हा त्या वक्तव्याचा आशय होता, असे गार्गी सपकाळ यांनी म्हटले. त्यांनी वडिलांचा वारकरी दिंडीतील फोटो शेअर करत टीकाकारांना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले. माझ्या वडिलांच्या विधानावरुन राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे, ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचे काम केले आहे. तेच आज अचानक अपमान झाल्याचे ढोंग करत आहेत. हीच खरी राजकीय चाल आहे, असे म्हणत गार्गी यांनी वडिलांच्या भूमिकेवर बाजू मांडत, वडिलांच्या वक्तव्याचा अर्थही समजावून सांगितला. माझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे आहेत. महाराजांच्या समता, न्याय व लोककल्याणाच्या आदर्शांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांना महाराजांचा हा समतेचा आणि न्यायाचा विचार मान्य नाही, ज्यांना फक्त प्रतीकांचा दिखावा प्रिय आहे, तेच लोक समाजात द्वेष पसरवतात. शेवटी, महाराजांचा विचार काय आहे हे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला वैचारिक वारशासोबतच पारिवारिक वारसाही लाभलेला आहे, असे गार्गी सपकाळ यांनी म्हटले आहे.