हर्षवर्धन सपकाळांचा कर्जमाफीवरून अजित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले…यांना लाज शरम वाटते का?

Harshawardhan Sapkal : सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही. तसेच शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाचे परतफेड करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. याबाबत आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागले आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते
हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र केले
लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल, असे उद्दामपणे सांगत आहेत, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळांनी केला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
सध्याच्या स्थितीत राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही. तसेच, शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, हे मान्य करत उपमुख्यमंत्री पवार यांनी, परंतु आता कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही आश्वासन दिले होते, पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना सध्या तर नाहीच; परंतु आणखी किमान तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.





