Harihar Fort : हरिहर किल्ल्यावर आता 300 जणांना प्रवेश; नाशिक वन विभागाचा मोठा निर्णय

नाशिक : वर्षासहलीसाठी शेकडोंच्या संख्येने येणारे पर्यटक, उपद्रव आणि हुल्लडबाजीतून होणारे अपघात रोखण्यासाठी वन विभागाने हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणली असून किल्ल्यावर यापुढे दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. गडाची कॅरिंग कपॅसिटी म्हणजेच भारवहन क्षमता निश्चित झालेला हरिहर हा पहिला किल्ला ठरला आहे. यापूर्वी कास पठारावरावर वन विभागाने दिवसाला तीन हजार पर्यटकांची मर्यादा निश्चित केली होती आणि त्याची पाच वर्षांत अंमलबजाणीही यशस्वी झाली आहे. हरिहर गडावर गेले दोन दिवस (शनिवार-रविवार) वन विभागाने हा प्रयोग राबविला आणि पर्यटकांची कोंडी रोखण्यास त्यांना यश आले.
समाजमाध्यमांवरील रील आणि पर्यटनाच्या व्हिडिओंमध्ये वर्षासहलींच्या यादी हरिहर गडाने लोकप्रियता मिळविली आहे. परिणामी, जूनच्या पहिल्या आठवड्यातच गडावर पर्यटकांची जत्रेसारखी गर्दी होते. या गडाची चढाई जोखमीची असतानाही अनेक हौशी पर्यटक अनुभव नसतानाही रील आणि व्हिडिओ करण्यासाठी गडावर जात असल्याचे चित्र होते.
यंदाही जूनमधील तिन्ही रविवारी गडावर पर्यटकांची गर्दी होती. वर्षासहलींच्या नावाखाली वाढत असलेल्या उपद्रवामुळे गंभीर अपघाताची शक्यता असल्याने नाशिक वन विभागाने कठोर पावले उचलली. पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी विशेष निवेदन काढून ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहरगड व दुगारवाडी धबधबा, नेकलेस फॉल (पहिने) ही ठिकाणे मद्यपानास निषिद्ध क्षेत्रे जाहीर करण्यात आली. पर्यटकाने मद्यपान केल्यास त्याला पर्यटन क्षेत्रात प्रवेश मिळणार नाही. सुरक्षारक्षक, गाइड यांच्याशी हुज्जत घातल्यास किंवा गैरवर्तन केल्यास कारवाई केली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
मोठ्या गटांना आता पुर्वनोंदणी सक्तीची
पर्यटकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास त्यावर नियंत्रण राखणे कठीण होते. त्यामुळेच हरिहर गडावर रोज तीनशे पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. दुपारी दोननंतर गडावर प्रवेश बंद असेल. दुपारी चारनंतर पर्यटकांना गडावर थांबता येणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठे गट घेऊन येणाऱ्यांना ७२ तास आधी 9420352395 या क्रमांकावर पूर्वनोंदणी सक्तीची केली आहे,’ अशी माहिती नाशिकचे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिली. तसेच याला पहिल्याच अठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून पर्यटकांचीही कोंडी झाली नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.





