हार्दिक पटेल यांनी चालवली कॉंग्रेसचा हात सोडण्याची तयारी? ट्विटरवरून हटवले पक्षाचे चिन्ह

अहमदाबाद – गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला. त्या प्रोफाईलवरून हार्दिक यांनी कॉंग्रेसच्या चिन्हाबरोबरच स्वत:च्या पदाचा उल्लेख हटवला. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडण्याची तयारी चालवल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरूण आणि प्रभावी नेते असणाऱ्या हार्दिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे असंतोष व्यक्त केला. गुजरातमधील पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एवढेच नव्हे तर, सत्तारूढ भाजपविषयी त्यांनी प्रशंसोद्गारही काढले. त्यामुळे हार्दिक वेगळ्या राजकीय वाटेने जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्या चर्चांना हार्दिक यांनी बदललेल्या ट्विटर प्रोफाईलमुळे आणखीच खतपाणी मिळणार आहे.
आता हार्दिक यांनी ट्विटरवरील नव्या प्रोफाईलमध्ये स्वत:चा उल्लेख भारतीय देशभक्त म्हणून केला आहे. गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात हार्दिक यांनी कॉंग्रेसचा हात सोडल्यास तो त्या पक्षासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.





