Hardik Delhi Capitals : हार्दिक पंड्याची गुजरात नव्हे तर ‘या’ नव्या संघात होणार एन्ट्री; फ्रँचायझीच्या एका फोटोने उडवली खळबळ!
Hardik Delhi Capitals : आता शर्यतीत नसलेल्या एका वेगळ्याच संघात हार्दिकची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Hardik Pandya Mumbai Indians Exit IPL 2027 Delhi Capitals Minnuh Mani Photo Post : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून (MI) खेळणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. हार्दिक मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट होताच, त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी आयपीएलमधील अनेक फ्रँचायझींमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. सीएसके, केकेआर आणि जीटी यांनी त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र, आता शर्यतीत नसलेल्या एका वेगळ्याच संघात हार्दिकची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ –
हार्दिक पंड्या नेमका कोणत्या ताफ्यात दाखल होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हार्दिकचा एक फोटो शेअर करून क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फोटोत हार्दिक पंड्यासोबत दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघातील भारतीय अष्टपैलू खेळाडू मिन्नू मणी (Minnu Mani) दिसत आहे.
‘हार्ट’ इमोजी अन् सूचक कॅप्शनने वाढवला सस्पेन्स –
Two India all-rounders catching up 💙❤️ pic.twitter.com/YnHkrMsL4g
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 12, 2026
दिल्लीच्या फ्रँचायझीने या फोटोसोबत अत्यंत सूचक कॅप्शन लिहिले आहे. “भारताचे दोन अष्टपैलू खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना…”, अशा शब्दांत फोटो शेअर करत दिल्ली कॅपिटल्सने सोबत ‘हार्ट’ इमोजीदेखील पोस्ट केला आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, हार्दिक पंड्या आयपीएल २०२७ च्या (IPL 2027) हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा निळा जर्सी परिधान करून मैदानात उतरणार का?
गुजरातसोबतची बोलणी का फिस्कटली?
याआधी हार्दिक पुन्हा एकदा आपल्या जुन्या गुजरात टायटन्स (GT) संघात परतणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, गुजरातच्या संघात परतण्यासाठी हार्दिकने पुन्हा एकदा कर्णधारपद देण्याची अट घातल्याने ही बोलणी फिस्कटल्याचे समजते. गुजरातची बोलणी बारगळल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सने थेट हार्दिकचा फोटो शेअर केल्यामुळे तो दिल्लीच्या संघात सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





